Search This Blog

MPSC Rajyaseva Prelim 2020 Booklist & Daily Study Plan | अभ्यास नियोजन |by Dheeraj Chavan STI/ASO

नुकत्याच जाहीर झालेल्या MPSC २०२० च्या  वेळापत्रकात राज्यसेवा पूर्व परीक्षा येणाऱ्या ५ एप्रिलला  नियोजित आहे . सन २०११ नंतर आयोगाच्या परीक्षा प्रक्रियापद्धतीत झालेला सकारात्मक आणि महत्त्वाचा बदल म्हणजे दर वर्षी नियमितपणे जाहिरात प्रसिद्ध होते आणि वेळापत्रकाप्रमाणे दरवर्षी परीक्षा होते. पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाची एक परीक्षा म्हणजे अभ्यासाची पंचवार्षिक योजना असे विनोदाने म्हटले जायचे. नियमित परीक्षांच्या आयोजनामुळे लाखो उमेदवारांना एक नवा विश्वास मिळाला आहे. त्यामुळे कसलीही कारणे किंवा सबबी न देता परीक्षांची संधी घेतली पाहिजे. त्याची तशी तयारीही आपण केली पाहिजे.
अभ्यासाचे नियोजन करताना, इथून पुढे महिन्यांचे, आठवडय़ांचे गणित न घालता, दिवसांचे व तासांचे गणित आखले पाहिजे. उपलब्ध वेळ, घटक विषयांपैकी सोपे-अवघड किंवा कमी सोपे-कमी अवघड वा जास्त सोपे-जास्त अवघड विषयानुरूप वेळेची विभागणी आणि योग्य अभ्यास साहित्याची निवड या बाबींचा मेळ बसवावा लागेल. मागील दोन-तीन वर्षांपासून अभ्यासात असलेल्या उमेदवारांना योग्य आणि उपयुक्त अभ्यास साहित्याची निवड करायला जास्त श्रम घ्यावे लागत नाहीत. त्यांना नेमक्या आणि उपयुक्त स्टडी मटेरिअलची चांगली समज असते. तेव्हा नव्या उमेदवारांनी अशा अचूक मार्गदर्शनासाठी सिनियर्सची जरूर मदत घ्यावी.
दरवर्षी परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांत, जुन्या म्हणजेच रिपीटर्स अर्थात सिनियर उमेदवारांची संख्या जास्त असते. तुलनेत पहिलाच प्रयत्न असणाऱ्या नव्या उमेदवारांची संख्या त्या मानाने कमी असते. एक-दोन-तीन किंवा त्यापेक्षा कमी-जास्त प्रयत्नांचा अनुभव असणाऱ्या अशा उमेदवारांचे अभ्यासाच्या रणनीतीबद्दल स्वत:चे काही आडाखे असतात.
कोणत्या घटक विषयाला जास्त महत्त्व द्यावे, कोणत्या संदर्भ पुस्तकांना हाताळावे, कोणत्या पुस्तकातून कोणता भाग अभ्यासावा,
याविषयी नेमके धोरण असते. एक-दोन परीक्षांतील यश किंवा अपयशाच्या अनुभवातून प्राप्त झालेले हे ज्ञान फार मोलाचे असते, आणि ते उपयुक्तही ठरते. पण स्पर्धा परीक्षांचा योग्य दृष्टिकोन विकसित झाला असेल तरच या दृष्टिकोनाच्या निकषावर बेतलेले पूर्वानुभवाचे ज्ञान फायद्याचे ठरेल. नाही तर अनुभव शिकण्यासाठी परीक्षेच्या एका संधीवर पाणी सोडावे लागेल. म्हणून योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे आहे.
अभ्यास धोरण ठरवताना मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण महत्त्वाचे असते. मागील काही वर्षांच्या प्रश्नांच्या अभ्यासातून, तुम्हाला कसा अभ्यास करूया प्रश्नाचे उत्तर मिळत जाईल, कळत जाईल. म्हणून प्रश्नपत्रिका विश्लेषण हा अभ्यासाचाच एक महत्त्वाचा भाग आहे. पुढील लेखापासून पूर्व परीक्षा प्रश्नांचे घटकवार विश्लेषण करून अभ्यास कसा करावा याची चर्चा करण्यात येईल.

सध्या मी माझ्या अनुभवातून तयार केलेली पुस्तकांची यादी व ५ एप्रिल पर्यंतचे,जवळपास 108 दिवसांचे  अभ्यासाचे रोजचे तासानुसार  नियोजन कसे असावे याचा नमुना देत आहे . \
आशा आहे आपल्या सर्वांना याचा नक्की फायदा होईल.
- धीरज चव्हाण, STI / ASO (राज्यात २ रा )पुस्तकांची यादी

108 दिवसांचे अभ्यास नियोजन 

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 : CSAT : उताऱ्यावरील आकलनांवर आधारित प्रश्नांची तयारी by Dheeraj Chavan STI/ASO


राज्यसेवा पूर्व परीक्षेतील सर्वात कठीण घटक अशी धारणा सध्या विद्यार्थ्यांची आकलन घटक विषयाबाबत झालेली दिसून येते.
या लेखात आपण ‘CSAT’मधील या उपघटकांची गतवर्षीच्या प्रश्नांच्या आधारे तयारी कशाप्रकारे करावी याची मा‌हिती बघू या.उताऱ्यावरील आकलनांवर आधारित प्रश्न

दरवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा बारकाईने अभ्यास केल्यास   एकूण ८० प्रश्नांपैकी ५० प्रश्न हे उताऱ्यावरील आकलनावर विचारले जातात असे आढळते. यामध्ये उताऱ्यांची संख्या १० आणि प्रत्येकी सरासरी 5 प्रश्न एका उताऱ्यावर विचारलेले आहेत. २०१५ पासून तरी साधारण सर्व उताऱ्यांची संख्या १० अशी राहिलेली आहे. 50 प्रश्न व 125 गुण, म्हणजे उताऱ्यावरील प्रश्न सोडवायला अधिक गुण आहेत. एकूण प्रश्नांपैकी उताऱ्यावरील प्रश्नांची संख्या जास्त आहे. त्यामुळे उतारे व त्यावरील प्रश्न सोडविण्याचा सराव अधिक करणे गरजेचे आहे. या १० उताऱ्यांपैकी ८ उतारे इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये दिलेले असतात ,ते सोप्या पद्धतीचे असतात. 
तर प्रत्येकी एक एक उतारा फक्त मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन चा असतो व तो अत्यंत कठीण पातळीचा असतो. आता आपल्याला असे वाटू शकते, की उतारा वाचून त्यावरील प्रश्न सोडविणे यात नवीन काय? कारण दहावी, बारावीपर्यंतसुद्धा अशा प्रकारच्या अभ्यासाला सामोरे जावेच लागलेले आहे; परंतु या ठिकाणी हे लक्षात घेणे गरजेचे आहे, की शाळा किंवा विद्यालय पातळीवरील परीक्षांच्या दर्जापेक्षा MPSC परीक्षांचा दर्जा काही पटीने जास्त वरचा आहे. शिवाय कमी वेळेत अचूक पर्याय शोधणे किंवा उत्तर निवडणे हे जास्त महत्त्वाचे आहे.

उतारा कसा वाचावा?

उतारा हा दोन भाषांमध्ये असतो. त्यामुळे आपण ज्या भाषेत योग्य प्रकारे आणि सहज व लवकर वाचू शकतो त्याच भाषेत शक्यतो उतारा वाचावा. म्हणजे आपण सराव करतानाच तशा प्रकारचा करावा आणि आपली वाचण्याची भाषा निश्च‌ित करावी. आयोगाचे काही काही उतारे जे मूळ इंग्रजीत आहेत त्यांचे भाषांतर मराठीत केलेले असते. अशा वेळी मराठीतूनसुद्धा उतारा समजण्यास अडचण येते; परंतु सराव करतानाच आपण हे लक्षात घेणे आवश्यक आहे, की कोणत्याही उताऱ्याचे तीन प्रमुख भाग असतात जसे पहिली ओळख किंवा विषयाचे ‘Introduction’ पहिल्या भागात, मग मधल्या भागात मुख्य आशय 'Core' आणि शेवटच्या भागात निष्कर्ष 'Conclusion' स्वरूपात काही उपाय किंवा समाधान दिलेले असते. 
एखाद्या भाषेत वाचताना किंवा समजताना अडचण येत असेल, तर मधला भाग म्हणजेच मुख्य आशय दोन्ही भाषांतून वाचून बघावा म्हणजे अर्थ जास्त स्पष्ट होतो. दुसरे महत्त्वाचे म्हणजे उतारा काळजीपूर्वक वाचणे फार आवश्यक आहे. सराव करतानाचा उतारा वाचायची आपापली सवय विकसित करणे आवश्यक आहे. जसे पहिले प्रश्न व नंतर उतारा वाचणे किंवा पहिला उतारा वाचणे आणि नंतर प्रश्न. या दोन्ही पद्धती आपापल्या सरावावर अवलंबून आहेत. पहिले प्रश्न वाचून घेतले आणि मग उतारा वाचला, तर प्रश्न वाचण्यामुळे काही प्रमुख शब्द आपल्या लक्षात राहतात आणि उतारा वाचताना मग आपण त्या शब्दांच्या जवळील माहिती आणखी लक्षपूर्वक वाचतो जेणेकरून आपल्याला उतारा समजायला मदत होते; परंतु हे आपण सराव कोणत्या पद्धतीने करतो त्यावर अवलंबून आहे.

उतारे हे वेगवेगळ्या विषयांशी निगडित असतात जसे पर्यावरण, सामाजिक विषय, अर्थव्यवस्था, राज्यघटना आदी. अशा वेळेस उताऱ्यात जी म‌ाहिती दिलेली आहे तेवढ्या माहितीचा आधार घेऊनच प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. कारण वर उल्लेखिलेल्या विषयांवर जर उतारा आला तर या विषयासंदर्भात आपल्याला असलेल्या ज्ञानाचा वापर आपण करण्याची भीती असते तसे होऊ न देणे.

उतारा वाचनाची तयारी कशी  करावी ?
वरती उल्लेख केल्याप्रमाणे उतारे हे विविध विषयांशी संबंधित असतात.त्यामुळे प्रत्येक विषयावर पकड येण्यासाठी आपण त्या त्या विषयाची अनेक पुस्तक वाचणे शक्य होणार नाही.त्यामुळे दैनदिन वृत्तपत्रे व रविवारच्या सकाळ ,महाराष्ट्र टाइम्स ,लोकसत्ता या वृत्तपत्रांच्या विशेष पुरवण्या पूर्ण वाचावयास हव्या. कारण यात प्रत्येक विषयांवर लेखन केलेले आढळून येईल.त्यामुळे 4-5 महिने आशा पुरवण्या वाचल्या तर कोणत्याही विषयावरचा उताऱ्याच्या आशय समजण्यास मदत होते, हे कृपया लक्षात घ्यावे.
नंतर उपलब्ध असलेले आयोगाचे मागील पेपर व सर्व पेपर सोडवावे.

उताऱ्यांची निवड

दहा पैकी दहा उतारे सोडवायलाच पाहिजेत, असा अट्टहास करणे योग्य नसते. कारण दहापैकी दोन/तीन उतारे क्लिष्ट क‌िंवा तत्त्वज्ञान विषयाला धरून येतात. त्यामध्ये उताऱ्यांवरील प्रश्नांची अचूकता जास्त राहात नाही. म्हणून उतारा कोणता सोडवायचा हेसुद्धा महत्त्वाचे आहे. उताऱ्यावरील प्रश्नांमध्ये जास्तीत जास्त अचूकता असणे गरजेचे आहे.

उताऱ्यांचा सराव

उतारा सोडविण्याचा सराव कसा करता येईल, हे बघू या. तुम्ही यासाठी बाजारातील उताऱ्यासाठी उपलब्ध पुस्तके घेऊन रोज दुपारी ३ ते ४ या वेळेत साठ मिनिटांत दहा उतारे सोडविण्याचा सराव करणे उत्तम. ३ ते ४ या वेळेतच का? कारण याच वेळेत आयोगाचा पेपर दुपारी ३ ते ५ असा असतो. आपल्याला १२० म‌िनिटांत उताऱ्यांवरील ५० प्रश्न, अधिक बुद्धिमत्ता अंकगणित यावरील २५ प्रश्न आणि निर्णयप्रक्रिया यांवरील पाच प्रश्न असे ८० प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणून सराव करतानाच ६० मिनिटांत १० उतारे सोड‌विण्याची सवय करणे उपयुक्त ठरते. म्हणजेच एक उतारा वाचणे व प्रश्न सोडविणे यास सरासरी सहा मि‌निटे असे वेळेचे नियोजन करावे लागते. यासाठी कमी वेळेत जास्त वाचून आणि वाचलेल्या उताऱ्याचे व्यवस्थित आकलन होऊन विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता येतील. यासाठी आपण वृत्तपत्रांतील संपादकीय उताऱ्यांची वाचण्याची सवय करणे उपयुक्त ठरते. जरा मला एखादे संपादकीय वाचायला १५ मिनिटे लागत असतील, तर ते मी सराव करून १० मिनिटे, मग आठ मिनिटे इतके जलद वाचून जे समजले, समजलेले मुद्दे लिहून काढणे अर्थ काय असू शकतो, अशा प्रकारे आपलाच उतारा कमी वेळेत वाचून त्याचा अर्थ समजणे अशी सवय विकसित करू शकतो. याशिवाय जास्तीत जास्त सराव चाचण्या तेही वेळ लावून सोडविणे गरजेचे आहे.‍

आता परीक्षेकरिता साधारणपणे भरपूर  कालावधी राहिलेला आहे. ३-४ दिवसातून एकदा  रोज दहा उतारे एक तासात सोडविणे आणि १० उताऱ्यांवरील ५० प्रश्नांपैकी किती प्रश्न बरोबर आहेत याचे चिकित्सक विश्लेषण करून प्रश्नांमध्ये जास्तीत जास्त अचूकता कशी आणता येईल यावर लक्ष देणे गरजेचे आहे . उतारे सोडविणे, त्याचे वेळेचे नियोजन, प्रश्नांची अचूकता या सर्व बाबी दररोजच्या सरावाने साध्य करता येऊ शकतात. त्यामुळेच 'Practice makes Man perfect' या तत्त्वावर सरावांद्वारे आपण या घटकाची तयारी करणे गरजेचे आहे.

CSAT मध्ये माझे मार्क  2018 ला 160 ,2019 ला 128
Blogger Widgets