Breaking

Search this Blog

26 November 2017

भारतीय संविधान -मुळ प्रत व काही अपरिचित गोष्टी | भारतीय संविधान मराठी pdf download

भारतीय संविधानाच्या मुळ प्रतीतील शिवराय, राम, कृष्ण, हनुमान आणि इतर…

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीने राज्यघटनेचा मसुदा संमत केला आणि २६ जानेवारी १९५० राज्यघटनेचा अंमल सुरु झाला. सुरुवातीला राज्यघटनेची कोणतीही छापील प्रत उपलब्ध नव्हती. दिल्लीच्या प्रेमबिहारी नारायण रायजादा (सक्सेना) यांनी संविधानाचे इंग्रजी आणि वसंत वैद्य यांनी हिंदी हस्तलिखीत तयार करण्याची जबाबदारी स्विकारली.
प्रेमबिहारी रायजादांनी अत्यंत सुंदर अक्षरात, वळणदार शैलीत राज्यघटनेचे २२ भाग, ३९५ कलमे आणि ८ परिशिष्टे यांचे कॅलिग्राफी काम केले. पहिल्या पानापासुन शेवटच्या पानापर्यंतचे हस्तलेखन अप्रतिम आहे. त्यासाठी त्यांना २५४ पेन आणि ३०३ निब लागल्या. त्यांनी लिहलेल्या प्रास्ताविकाला बिओहर राममनोहर सिन्हा यांनी अत्यंत उत्कृष्ट नक्षीकाम केले. तसेच प्रत्येक पानावर महान चित्रकार नंदलाल यांच्या नेतृत्वाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी चौकटीचे नक्षीकाम केले.
रायजादांचे ते महत्वपुर्ण कार्य पाहुन सरदार पटेल व जवाहरलाल नेहरु त्यांना भेटले आणि त्यांच्या कामाचे मुल्य, खर्च याबद्दल विचारले. तेव्हा रायजादांनी सांगितले की, “मला काहीही पैसे नकोत, फक्त मी हस्तलिखिताच्या प्रत्येक पानाच्या डाव्या कोपऱ्यात माझं छोटंसं हस्ताक्षर PREM लिहतो आणि शेवटच्या पानावर आपलं पुर्ण नाव तसेच चित्रकार नंदलाल बोस यांचे नाव लिहतो.” पटेल आणि नेहरुंनी ते मान्य केले आणि डॉ.राजेंद्रप्रसाद आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना त्याबद्दल सुचित केले.
महान चित्रकार नंदलाल बोस यांनी मुळ हस्तलिखीत प्रतीच्या प्रत्येक भागाची सुरुवात करताना भारतीय उपखंडाची संस्कृती आणि इतिहास यांना समोर एकुण २२ ठेवुन दृश्ये रेखाटली आहेत. वेगवेगळ्या कालखंडातील बाबींचे प्रातिनिधिक चित्रण त्यात केले आहे. जवळजवळ चार हजार वर्षांच्या समृद्ध ऐतिहासिक परंपरेचा धावता आढावा त्यांनी घेतला आहे. त्यांनी २२१ पृष्ठांना आपल्या कुंचल्यातुन सजवल्याबद्दल त्यांना २१००० रुपये श्रममोबदला देण्यात आला.
नंदलाल बोस यांनी रेखाटलेल्या चित्रांमध्ये मोहेंजोदडो, सिंधु संस्कृतीतील वृषभ, वैदिक काळातील गुरुकुल पद्धती, रामायणातील श्रीराम-लक्ष्मण-सीता-हनुमान, महाभारतातील श्रीकृष्ण-अर्जुन संवाद, गौतम बुद्ध-महावीरांचा तत्वज्ञान प्रचार, सम्राट विक्रमादित्य-अशोकाची न्यायव्यवस्था, मोगल कालखंडातील औरंगजेब, अकबर बादशहा, मराठा कालखंडातील छत्रपती शिवाजी महाराज यांची निवडप्रक्रिया, चोल कांस्य परंपरेतील नटराज मुर्ती याशिवाय गुरु गोविंदसिंह, राणी लक्ष्मीबाई, टिपु सुलतान, गांधीजींची दांडी यात्रा, सुभाषचंद्र बोस, नालंदा विद्यापीठ, भारताचे प्राकृतिक हिमालय, वाळवंट, महासागर घटक अशा बाबींची चित्रे वेगवेगळ्या प्रकरणांच्या सुरुवातीला रेखाटण्यात आली आहेत.
राज्यघटनेच्या विविध प्रकरणात असणाऱ्या मुल्यांशी संबंधित ऐतिहासिक संदर्भ घेऊनच ती चित्रे काढण्यात आली आहेत. उदा.रामराज्यात प्रजा आदर्शवत जीवन जगत होती, त्यांच्यावर कुणाची बंधने नव्हती; म्हणुन मुलभुत हक्कांच्या प्रकरणावर रामाचे चित्र आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला आदर्श क्षत्रियाचे कर्तव्य समजावुन सांगितले, म्हणुन राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांच्या प्रकरणावर श्रीकृष्ण-अर्जुनाच्या संवादाचे चित्र आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात लोकांना त्यांचे गुण, कर्तृत्व बघुन पदे देण्यात आली. छत्रपती शिवरायांनी त्या पदांसाठी योग्य व्यक्तीची निवड केली. त्यामुळे राज्यघटनेतील १५ वे प्रकरण निवडणुका यावर छत्रपती शिवरायांचे चित्र रेखाटले आहे. आपल्या सर्वांसाठी ती अभिमानाची बाब आहे.
राज्यघटनेच्या ११ पानांवर घटना समितीच्या सदस्यांच्या सह्या आहेत. पहिली सही डॉ.राजेंद्रप्रसाद यांची तर शेवटची सही फिरोज गांधी यांची आहे.
भारतीय संविधानाच्या मुळ हस्तलिखीतात श्रीराम, श्रीकृष्ण, हनुमान, बुद्ध, महावीर यांची चित्रे असली तरी त्याला कुठल्या धर्माच्या नजरेतुन पाहिलं गेलं नाही. ही चित्रे सांगतात की भारताचा नवा कायदा हा भारताच्या ऐतिहासिक परंपरा आणि आदर्शांवर टिकुन आहे.
भारतीय संविधानाची मुळ इंग्रजी व हिंदी प्रत सध्या भारतीय संसदेच्या लायब्ररीत हेलियम केसमध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहे. प्रेमबिहारी नारायण रायजादा यांच्या हस्तलेखनातुन साकार झालेल्या आणि चित्रकार नंदलाल बोस, बिओहर राममनोहर सिन्हा व शांतिनिकेतनमधील इतर कलाकारांच्या आकर्षक चित्र, नक्षीकामातुन साकार झालेल्या या मुळ प्रतीच्या फोटोलिथोग्राफी (शिलाप्रकाशलेखन) पद्धतीचा वापर करुन “The Survey Of India” च्या डेहराडुन कार्यालयात १००० प्रती तयार करण्यात आल्या. त्यातल्याच एका प्रतीच्या पानांच्या फोटोवरुन तयार केलेली PDF फाईल तुम्ही पुढील लिंक वरुन डाऊनलोड करु शकता.

No comments:

Post a Comment

तुमचे प्रश्न व अभिप्राय येथे लिहा