Breaking

Search this Blog

31 August 2012

MPSC:Think Positive Think different




पदवी, शिक्षण, योग्य व्यवसाय निवडणे एवढ्यावरच पुरेसे नाही. त्याशिवाय यशस्वी होण्यासाठी इतर नैपुण्येसुद्धा संपादन करणे गरजेचे असते. मुलाखतीसाठी किंवा प्रकल्प सादर करण्यासाठी निव्वळ ज्ञान असून उपयोगी नाही. आपले बोलणे स्पष्ट, मुद्देसुद, तर्कशुद्ध व ते सुद्धा मनोरंजक पद्धतीने सांगता आले पाहिजे व त्यासाठी संभाषण कौशल्य आत्मसात करायला हवे. त्यासाठी कॉलेजच्या किंवा इतर वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजूषा, निबंध स्पर्धा, इ सक्रिय भाग घेणे जरुरीचे आहे. इतकेच नाही तर चांगल्या वक्त्यांची भाषणे ऐकणे, तसेच. टी. व्ही., आकाशवाणी इ. वर चाललेल्या चर्चा ऐकाव्यात.

एखादा प्रकल्प असो किंवा व्यावसायिक पत्र लिहायचे असो. ते सुस्पष्ट शब्दात, थोडक्यात व मुद्देसुदपणे योग्य माहिती आकडेवारीसह लिहिणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी चांगले लेखनकौशल्य अंगी असणे गरजेचे आहे. हे कसे वाढवावे अथवा विकसित करावे. त्यासाठी एक तर भाषेवर प्रभुत्व हवे. दुसरे म्हणजे कादंब-या विविध विषयावरील पुस्तके, वर्तमानपत्रे व मासिके (जर्नल्स) वाचणे अशा प्रकारे तुम्ही लेखन व संभाषण ही दोन्ही अंगे विकसित करू शकाल. निबंध आणि कथा लिहिणे व स्पर्धात भाग घेणे व शाळा कॉलेजातील नियतकालिकात भाग घेऊनही हे साध्य करता येईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सोबत पॉकेट डिकश्नरी व एक छोटी वही सतत बाळगणे. कोणताही शब्द अडला की त्याचा अर्थ ताबडतोब पाहता येतो. त्याचप्रमाणे काही महत्त्वाची माहिती, (आवडलेल्या किंवा उपयोगी पुस्तकाचे नाव) थोरांची वचने. इ. छोट्या वहीत लिहून त्यासंबंधीचा पाठपुरावा नंतर करता येतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रॉजेटचा थिसॉरस हा इंग्रजी भाषेसाठी व मराठीसाठी ठकार यांचा ‘मराठी-इंग्रजी शब्दकोश’, याचा वापर करावा. कित्येकदा लिहिताना किंवा भाषणाची तयारी करताना आपल्याला नेमका शब्द आठवत नाही, अशावेळी थिसॉरस उपयोगी पडतो. एकाच शब्दाच्या अनेक छटा त्यात दिलेल्या असतात. उदा. आनंद - यासाठी संतोष, हर्ष, मोद, आमोद, प्रमोद, समाधान, आल्हाद, उल्हास, आराम, चैन, इ. इ. आपल्याला हवा असलेला नेमका शब्द आपण निवडू शकतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसजसे आपण दहावी, बारावी किंवा कॉलेजला जातो, तसतसे जास्त प्रमाणात वाचन करावे लागते. साहजिकच आपल्या वाचनाचा वेग वाढवावा लागतो नाही तर संपूर्ण अभ्यास होणे कठीण असते. त्यासाठी जलद वाचन करायची सवय लावावी लागते. त्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.

माणसे हाताळण्याचे कौशल्य : विद्यार्थी दशेत तुमची कामे तुम्ही करत आला आहात व तुमच्या क्षमतेची आणि लागणाºया वेळाची तुम्हाला योग्य जाणीव असते. परंतु नोकरी करायला लागल्यावर तुमची करिअर ही तुम्ही ज्यांच्यावर देखरेख करता, ज्याना मार्गदर्शन करता त्यांच्यावरही अवलंबून असते. तुमचे यश हे हाताखालील काम करणा-यांच्याकडून तुम्ही ते किती परिणामकारकरीत्या करवून घेता यावर अवलंबून असते. समजा तुम्ही एखाद्या इंजिनअरिंग प्रकल्पाचे प्रमुख आहात. मग साहजिकच अनेक कामगार, कंत्राटदार, कारकुन, इ. तुमच्या हाताखाली असतात. सर्वांच्या सहकार्याने काम करवून घेऊन प्रकल्प वेळेवर पुरा करणे ही संपूर्णत: तुमची जबाबदारी असते.

क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, हुतुतू  इत्यादी सांघिक खेळ संघटितपणे काम करण्याची भावना निर्माण करतात. असे खेळ खेळणे हाही एक उपाय आहे. ज्या उपक्रमात / कार्यक्रमात अनेक लोक सहभागी असतात असा कार्यक्रमात भाग घ्यावा. मग तो क्रिकेटचा खेळ, लग्नसमारंभ कॉलेजातील एखादा कार्यक्रम किंवा प्रेक्षणीय स्थळे पाहण्याची सहल असो, त्यात जरूर भाग घ्यावा. लोकाने हाताळणे हे सोपे वाटत असले तरी प्रत्यक्षात हे कौशल्य आत्मसात करणे ही कठीण बाब आहे. पण एकदा का लोकांना हाताळायचे जमले आणि त्यांच्याकडून वेळेवर काम करून घ्यायचे तंत्र जमले की तुम्ही कोणतेही काम करू शकाल.

प्रश्न सोडवण्याची हातोटी : शाळा कॉलेजमध्ये पुस्तकाच्या काही गणिताचे, भौतिकशास्त्रांचे प्रश्न असतात. आपल्या ज्ञान-कौशल्यावर आपण त्याची उत्तरे काढतो व पुस्तकाच्या शेवटी दिलेल्या उत्तराशी जुळते की नाही ते पाहतो. उत्तर चुकले तर पुन्हा सोडवतो किंवा दुस-या कोणाला तरी विचारून योग्य ते उत्तर काढतो. कारण अशा प्रश्नाची उत्तरे नेमकी असतात. प्रत्यक्षात संशोधनक्षेत्रात, प्रयोगशाळेत काम करू लागता तेव्हा तुमच्यासमोरील प्रश्न वेगळे असतात व त्याची उत्तरे तुम्हाला तुमचे शास्त्रीय  ज्ञान, बुद्धिचातुर्य आणि इतर कौशल्ये वापरून सोडवावी लागतात. निव्वळ शास्त्रीय संशोधनासंबधी प्रश्न असेल तर तुम्हाला उत्तरे मिळण्याची बरीचशी खात्री असते. पण दैनंदिन जीवनातील प्रश्नांना समोर जायचे असेल तेव्हा परिस्थिती थोडीशी वेगळी असते. कारण या प्रश्नांची उत्तरे चूक की बरोबर याचा पडताळा तुम्हाला पाहता येत नाही. तुम्ही खात्री करून घेऊ शकत नाही. समोर असलेल्या मर्यादा आणि परिस्थितून योग्य उत्तर निवडणे एवढाच काय तो पर्याय तुमच्यासमोर असतो. यासंबंधी एक उदाहरण आपण पाहू या.

समजा, रसायनाचे उत्पादन करणा-या कंपनीचे तुम्ही प्रमुख आहात. तुमची कंपनी ज्या रसायनाचे उत्पादन करते तेच दुसरी कंपनी करते व इतकेच नाही तर कमी किमतीत विकते असे तुम्हाला आढळून आले. साहजिकच तुमचा नफा कमी होणार. तुमच्या कंपनीचा नफा वाढवायला अनेक पर्याय आहेत. पहिला म्हणजे तुमच्या मालाची प्रत सुधारावी, म्हणजे महाग असली तरी चांगले असल्याने विकले जाईल. फक्त मालाच्या दर्जावर सतत नियंत्रण ठेवावे लागेल. दुसरा तुमच्या उत्पादनाची किंमत कमी करणे आणि तुमच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा खाली आणणे. त्यामुळे तुमचा नफा देखील कमी होणार. तिसरा ते उत्पादन बंद करून नवीन चालू करणे. अर्थात त्यासाठी नवीन कारखान्यासाठी गुंतवणूक करावी लागेल व नवीन मशिनरी आणावी लागेल.  चौथा मार्ग म्हणजे तुमच्या प्रतिस्पर्ध्याला येनकेन प्रकारे बाजारातून उठवणे, अर्थात हा नकोसा व नैतिकतेत न बसणारा आहे व साहजिकच आपण तो वापरणार नाही. तुम्ही कोणता पर्याय निवडणार? 

थोडक्यात काय दैनंदिन   आयुष्यात वास्तव परिस्थितीतील प्रश्नासाठी खूप पर्याय उपलब्ध असतात व त्यातून एकच निवडायचा असतो. तुमचे व्यवसायातील यश हे प्रश्न तुम्ही सोडवण्याचे निर्णय कसे घेता यावर अवलंबून असते. पण असे प्रश्न कसे सोडवायचे ह्याचे प्रात्यक्षिक ज्ञान आपली शिक्षण पद्धती देत नाही. मग असा अनुभव कसा मिळवणार ? एक उपाय म्हणजे एकट्याने प्रवास करा. तुम्ही एकटे असता तेव्हा सर्व प्रश्नांना तुम्हाला एकट्याला सामोरे जावे लागते. दुसरा उपाय म्हणजे जास्त किचकट/ क्लिष्ट घरगुती प्रश्न स्वत:च्या जबाबदारीवर सोडवा. जे लोक अवघड वा कठीण कामे करतात अशांशी मैत्री करा. त्याना कोणत्या प्रकारच्या  प्रश्नाना सामोरे जावे लागते व ते लोक कसे मार्ग काढतात हे समजून घ्या.

सायन्स रिपोर्टर,  डाऊन टु अर्थ,  इलेक्ट्रॉनिक्स  फॉर यू, मराठी विज्ञान परिषद पत्रिका, इ. मासिके वाचा. त्याचप्रमाणे बाँबे नॅचरल सोसायटी, इंडियन फिजिक्स असोसिएशन, असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स, इ. आपल्या आवडीच्या व्यावसायिक संघटनेचे सभासद व्हा. आणखी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमित व्यायाम करून आपल्या प्रकृतीची काळजी घ्या.

तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!

No comments:

Post a Comment

तुमचे प्रश्न व अभिप्राय येथे लिहा